गणेश विसर्जनाच्या दिवशी, भक्तगण गणपतीला ढोल-ताशाच्या गजरात निरोप देतात आणि त्याची मूर्ती पवित्र नद्यांमध्ये विसर्जित करतात. या दिवशी बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. पण गणपती विसर्जन पाण्यात का केले जाते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? दहा दिवसांच्या पूजेनंतर गणपतीची मूर्ती पाण्यात का विसर्जित केली जाते?
पौराणिक मान्यतेनुसार असे मानले जाते की, महर्षी वेदव्यासांच्या सांगण्यावरून भगवान गणेशाने महाभारत लिहिले आहे. महर्षी वेदव्यास यांनी सलग 10 दिवस गणपतीला महाभारताची कथा सांगितली आणि त्यांनी ही कथा 10 दिवस तंतोतंत लिहिली. 10 दिवसानंतर जेव्हा महर्षी वेदव्यासांनी गणपतीला स्पर्श केला तेव्हा, त्यांना गणपतीच्या शरीराचा अक्षरशः चटका लागला. त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. वेदव्यासांनी त्यांना ताबडतोब जलाशयात डुबकी मारण्यास सांगितली. यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान सामान्य झाले. तेव्हापासून असे मानले जाते की, गणपतीचे विसर्जन हे त्यांना शीतल करण्यासाठी केले जाते.
भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव सुरू होतो. चतुर्दशी तिथीपर्यंत गणेशाची पूजा केली जाते. श्री गणेश मूर्तीची स्थापना चतुर्थी तिथीला केली जाते आणि चतुर्दशी तिथीला बाप्पाचे विसर्जन केले जाते. या नऊ दिवसांना गणेश नवरात्र म्हणतात. असे मानले जाते की मूर्तीचे विसर्जन करून भगवान पुन्हा कैलास पर्वतावर पोहोचतात. या दिवशी अनंत शुभ फळ मिळू शकतात. म्हणून या दिवसाला अनंत चतुर्दशी असेही म्हणतात.